माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा: लोकप्रिय मराठी कविता

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी कुसुमाग्रज (विष्णू वामन शिरवाडकर) यांची माझ्या मराठी मातीचा ही लोकप्रिय मराठी कविता

Nov 17, 2023 - 20:34
Nov 20, 2023 - 22:38
 0  118
माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा: लोकप्रिय मराठी कविता

माझ्या मराठी मातीचा,
लावा ललाटास टिळा;
हिच्या संगाने जागल्या,
दर्‍याखोर्‍यांतील शिळा ॥ १॥

हिच्या कुशीत जन्मले,
काळे कणखर हात;
ज्यांच्या दुर्दम धीराने,
केली मृत्यूवरी मात ॥ २॥

नाही पसरला कर,
कधी मागायास दान;
स्वर्णसिंहासनापुढे,
कधी लवली ना मान ॥३ ॥

हिच्या गगनांत घुमे,
आद्य स्वातंत्र्याची द्वाही;
हिच्या पुत्रांच्या बाहूंत,
आहे समतेची ग्वाही॥४ ॥

माझ्या मराठी मातीला
नका म्हणू हीन दीन
स्वर्गलोकाहून थोर
मला हिचे महिमान ॥५॥

रत्नजडित अभंग
ओवी अमृताची सखी
चारी वर्णांतुनी फिरे
सरस्वतीची पालखी ॥ ६ ॥

रसरंगात भिजला
येथे शृंगाराचा स्वर
येथे अहंता द्रवली
झाले वसुधेचे घर ॥७ ॥

माझ्या मराठी मातीचा
नका करू अवमान
हिच्या दारिद्य्रात आहे
भविष्याचे वरदान॥ ८॥

माझ्या मराठी मातीचा,
लावा ललाटास टिळा;
हिच्या संगे जागतील,
मायदेशांतील शिळा ॥ ९॥

- कुसुमाग्रज (विष्णू वामन शिरवाडकर)