आमच्याबद्दल

२७ फेब्रुवारी. मराठीतील प्रख्यात साहित्यिक कुसुमाग्रज अर्थात वि.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिन! हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो आणि मराठी भाषा गौरव दिनाची चाहूल लागली की मराठी भाषेच्या अभिजात दर्जाबद्दलची चर्चा सुरू होते.

५२ बोली भाषांना आपल्या कवेत घेणारी, त्या बोली भाषांचा सन्मान करणारी, १२०० पेक्षा जास्त शब्दकोश असणारी अशी आपली "अभिजात मराठी". जगामध्ये सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या, साहित्यिक दृष्ट्या श्रेष्ठ, श्रीमंत आणि समृद्ध असणाऱ्या भाषेमध्ये माय मराठीचा समावेश होतो. तिच्या २००० वर्षांपासूनच्या ऐतिहासिक प्रवासाचे संदर्भ पाहता विविध शतकांमध्ये विविध संतांपासून ते आजकालच्या साहित्यिकांनी दिलेल्या योगदानाचा विचार केला तर तिचं अभिजातपण स्वयंसिद्ध आहेच. परंतु मराठीचा सन्मान वाढावा, मराठी लोकांमधील भाषेविषयीचा आत्मविश्वास वाढावा, मराठी शाळांचा दर्जा सुधारावा ह्या आणि इतर अनेक फायद्यांच्या दृष्टीने मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणे महत्वाचे आहे.

आपली मराठी भाषा अभिजात आहेच आणि आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळायलाही हवा पण आपल्याला केवळ भारत सरकारच्या दिल्या जाणाऱ्या "अभिजात दर्जा" वर अवलंबून न राहता भाषा उत्कर्षासाठी माय मराठीतून शिक्षण घेणे, तिच्या संवर्धनासाठी दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेचा जास्तीतजास्त उपयोग करणे, येणाऱ्या पिढीवर मराठी भाषेचे संस्कार करणे सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. अभिजात भाषेचा, मराठीचा मुद्दा फक्त २७ फेब्रुवारी अथवा राजकारणापुरता मर्यादित न ठेवता 'म' मराठीचा आणि 'म' महाराष्ट्राचा, हे सर्वांच्या मनावर ठसवणे गरजेचे आहे.

भविष्यात मराठी भाषा नामशेष तर नक्कीच होणार नाही पण माय मराठीला तिचे हक्काचे अभिजात स्थान मिळवून देण्याची आपली जबाबदारी किंबहुना आपले कर्तव्यच आहे. बदलत्या काळाचा, पिढीचा विचार करता मराठी भाषेचे डिजीटल स्वरूप देखील अधिकाधिक व्यापक होणे गरजेचे आहे. इतर भाष्यांच्या गर्दीमध्ये आम्ही मराठी भाषेचा, साहित्याचा, संस्कृतीचा जगभर प्रसार आणि प्रचार करण्याचा प्रामाणिक प्रयत्न "अभिजात मराठी डॉट कॉम" च्या माध्यमातून करत आहोत आणि ह्यासाठी आम्हाला हवी आहे तुमची साथ, आशीर्वाद आणि मार्गदर्शन.

"अभिजात मराठी डॉट कॉम" आहे तुमचे.. आमचे.. आणि माय मराठीवर प्रेम करण्याऱ्या सर्वांचे.. ह्याला सर्वसमावेशक बनवण्याची जबाबदारी सुद्धा आपल्या सर्वांचीच.. धन्यवाद

- अभिजात मराठी डॉट कॉम | गौरव मराठी भाषेचा